
पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला. प्रवासी विमानात बसल्यानंतर विमानातील तापमान अचानक वाढल्याने वयोवृद्धांसह अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर असतानाही विमान धावपट्टीवर नेण्यात आल्याने प्रवाशांनी उड्डाणास तीव्र विरोध केला. अखेर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे विमानातील बिघाड लक्षात आला आणि सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानात आबालवृद्ध प्रवासी होते. विमानातील तापमान अचानक एवढे वाढले की प्रवाशांना ते असह्य झाले. अनेक प्रवासी घामाने अक्षरशः भिजले होते, तर काहींना श्वास घेण्यास मोठा त्रास होत होता.
अशा परिस्थितीतही विमान धावपट्टीवर नेण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा करत विमानाचे उड्डाण करू नये, अशी मागणी केली. प्रवाशांनी विरोध केल्यानंतर वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमानात प्रत्यक्षात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले आणि प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. प्रवाशांनी विमान कंपनीच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे.
या घटनेची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गंभीर दखल घेऊन स्पाइसजेटविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. तसेच विमानातील तांत्रिक बिघाड असताना उड्डाण करण्याचा प्रयत्न झाला का, प्रवाशांच्या तक्रारींकडे सुरुवातीला दुर्लक्ष का करण्यात आले आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड