संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी महेश केदारचा जामीन फेटाळला
बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड येथील विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने आरोपी महेश केदार याने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल
संतोष देशमुख


बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)।

: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड येथील विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने आरोपी महेश केदार याने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष मारुती देशमुख (वय ४५, रा. मस्साजोग, ता. केज) यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपी महेश केदार (वय ३२, रा. बीड) याच्यासह इतर आरोपींवर संघटित गुन्हेगारी, अपहरण, खंडणी आणि हत्येचा गंभीर गुन्हा दाखल आहे. हत्येच्या वेळी अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो महेश केदार याच्या मोबाईलमध्ये आढळल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

या प्रकरणात दोन्ही बाजूंचा सविस्तर आणि जोरदार युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत महेश केदारचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

सदर प्रकरणातील मुख्य आणि सहआरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विशेष तपास पथक (SIT) आणि सीआयडीचे (CID) अधिकारी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande