
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षितता, स्वयंरक्षण, कायदेविषयक जागरूकता आणि सोशल मीडिया वापराबाबत सजगता निर्माण करण्यासाठी लातूर पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमांतर्गत दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे सुमारे ३५० विद्यार्थिनींशी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी संवाद साधला.
दयानंद कला महाविद्यालयात हर्षदा जोशी पुराणिक लिखित ‘स्त्री स्वयंरक्षणार्थाय : एक पाऊल सजगतेकडे’ या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत महिला सुरक्षितता, स्वयंरक्षण आणि सोशल मीडिया वापरासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीत मुलींना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना केलेली छोटीशी चूकदेखील भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते, याबाबत पोलीस अधीक्षकांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
अनोळखी व्यक्तींच्या मैत्री विनंत्या स्वीकारू नयेत, अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक संवाद साधू नये, वैयक्तिक माहिती अथवा छायाचित्रे कोणासोबतही शेअर करू नयेत आणि नोकरी किंवा इतर कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सोशल मीडियावरील छायाचित्रांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक अथवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर जबाबदारीने आणि पूर्ण सजगतेने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भावनिक निर्णय घेताना सावध राहण्याचे आवाहन
विद्यार्थिनींच्या आयुष्यातील संवेदनशील विषयावरही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्याआधी पुरेशी समज नसताना भावनिक निर्णय घेऊन घरातून निघून गेल्यास संबंधित मुलीसह तिच्या आई-वडिलांनाही मोठ्या मानसिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे पालकांनी शिक्षणासाठी ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करावा, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि भविष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना पालकांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
अडचण आल्यास घाबरू नका; पोलिसांशी संपर्क साधा
शिक्षण घेत असताना कोणत्याही विद्यार्थिनीला अडचण आली, कोणी त्रास दिला किंवा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर घाबरून न जाता डायल ११२, जवळचे पोलीस ठाणे अथवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी न घाबरता पोलिसांसमोर मांडाव्यात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक मदतीसाठी लातूर पोलीस दल सदैव तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
दरम्यान, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि धैर्य निर्माण करून त्यांना सुरक्षितपणे पुढे जाण्यास प्रेरणा देणारे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिका हर्षदा जोशी पुराणिक यांचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जनजागृती, संवाद आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis