
सोलापूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)बालाजी सोसायटी, कुमठा नाका येथील रहिवासी आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र वीरसिंह परदेशी (वय ४५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
वीरेंद्र परदेशी हे सेवाभावी वृत्ती, मितभाषी स्वभाव आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वासाठी परिचित होते. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यास नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे विविध क्षेत्रांतील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे संस्थेच्या उपक्रमांना बळ मिळाले होते.
वीरेंद्र परदेशी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, दोन बहिणी, एक भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवाराने दुःख व्यक्त केले. अनेकांनी त्यांच्या सामाजिक योगदानाला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड