रायगड - १५ ऑगस्टपासून जलसंधारण सप्ताह; २१ ऑगस्टला राज्यभर महा वॉकेथॉन
रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत रा
Water-Conservation-Week-starts


रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे.

युवकांना जल व मृदसंधारणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांचा या चळवळीत सक्रिय सहभाग वाढविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशासह तीन किलोमीटरची वॉकेथॉन सकाळी ६ वाजता सुरू होईल.

१५ वर्षांवरील पुरुष व महिला नागरिकांसाठी ही वॉकेथॉन खुली असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांना टी-शर्ट, कॅप, डिजिटल प्रमाणपत्र तसेच बक्षिसे दिली जाणार आहेत.

दरम्यान, १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांत निबंध, चित्रकला व वादविवाद स्पर्धांसह ‘एक शाळा-एक शोषखड्डा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी काविजीत पाटील यांनी नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande