
रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । लांजा शहरात मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसाठी उबाठा शिवसेना नांगरणी स्पर्धा घेणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचा इशारा दिला आहे.
लांज्यातील आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते कुलकर्णी काळे छत्रालय येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या कारभाराविरोधात प्रतीकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्र पक्षाचे कार्यकर्ते अभिजित राजेशिर्के यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तसेच लांज्याच्या तहसीलदारांना दिले आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा शाळा, तहसीलदार कार्यालय, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालये असल्यामुळे लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिकांची मोठी वर्दळ असते. हा मुख्य मार्ग असून गोव्यापासून ते मुंबईपर्यंत अनेक लोक, मोठे व्यावसायिक याच मार्गावरून प्रवास करतात. मोठमोठ्या सामानाच्या किंवा मालाच्या गाड्यादेखील याच मार्गावरून प्रवास करत असतात. मात्र चुकीच्या धोरणामुळे लांजा शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यासंदर्भात वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदारांशी पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही होत नाही. सातत्याने होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीमुळे प्रतीकात्मक निषेध नोंदवण्यासाठी नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या तसेच लांजा शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व खड्डेमय रस्त्यांच्या संदर्भात संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा १५ ऑगस्ट रोजी या सर्व खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येईल असा इशारा लांजा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील पत्र लांजा नगर पंचायत, लांजा तहसीलदार आणि लांजा पोलिस ठाणे यांना दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी