
नंदुरबार, 13 ऑगस्ट (हिं.स.) जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, 'द स्पाइन फाउंडेशन, मुंबई', डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार आणि लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी कळविले आहे.
हे शिबीर मंगळवार, दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 या वेळेत जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार बाह्यरुग्ण विभागात पार पडणार
आहे.
5 सप्टेंबर रोजी होणार मोफत शस्त्रक्रिया
शिबीरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची प्राथमिक व सखोल तपासणी केली जाईल. तपासणीनंतर ज्या
रुग्णांना मणक्याच्या शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) आवश्यकता भासेल, अशा गरजू रुग्णांवर 05 सप्टेंबर 2026 रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
रुग्णांसाठी महत्त्वाच्या सूचना व आवश्यक कागदपत्रे:
वैद्यकीय कागदपत्रे: रुग्णांनी तपासणीसाठी येताना पूर्वीच्या उपचाराच्या सर्व फायली, कागदपत्रे
आणि उपलब्ध असल्यास एम.आर.आय. (MRI) अहवाल सोबत आणणे आवश्यक आहे.
मोफत उपचार योजना: मणक्याच्या शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांवर 'महात्मा जोतिबा फुले
जनआरोग्य योजने' अंतर्गत पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. यासाठी रुग्णांनी आधार कार्ड,
रेशन कार्ड व आयुष्मान कार्ड सोबत आणावे.
पूर्व नोंदणी व संपर्क: शिबीराच्या पूर्व नोंदणीसाठी मोबाईल 7350779142 यावर संपर्क साधावा.
नंदुरबार जिल्हा व परिसरातील मणक्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या सर्व गरजू रुग्णांनी वेळेवर उपस्थित राहून या मोफत वैद्यकीय शिबीराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर