
लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयात अहमदपूर–चाकूर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत सविस्तर बैठक पार पडली.
यामध्ये मतदारसंघातील दुष्काळप्रवण भागाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळावी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचावे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते ऊर्ध्व मानार प्रकल्पातील प्रस्तावित झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजना, ता. चाकूर, जि. लातूर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पाची प्रस्तावित अंदाजित किंमत ₹४,३९१.५५ कोटी असून, सुमारे ८,८०० हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आणि ८,००० हेक्टर सिंचन क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. प्रस्तावित झरी साठवण तलावात ५० दलघमी पाणी साठवून अहमदपूर व चाकूर तालुक्यातील अंदाजे ८,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला स्थैर्य मिळण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळणार आहे.
यासोबतच अहमदपूर शहरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहासाठी जलसंपदा विभागाच्या मालकीची ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. जलसंपदा विभागाच्या व्हटी मध्यम प्रकल्प वसाहतीतील ही जमीन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी अहमदपूर येथे सुरक्षित आणि सुलभ निवासाची सुविधा मिळावी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि महिला सक्षमीकरणाला बळ मिळावे, या उद्देशाने या वसतिगृहाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या विषयासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पत्रानंतर तसेच संबंधित विभागांच्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. अशी माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis