
रायगड, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। : शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील पहिल्या पात्र यादीतील ७ हजार ३६७ शेतकरी खात्यांपैकी आतापर्यंत २ हजार ८४६ खात्यांचे म्हणजेच ३९ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८ हजार ९१४ आणि राष्ट्रीयकृत बँकांची ३ हजार ७६८ अशी एकूण १२ हजार ६८२ शेतकरी खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ७ हजार ३६७ खात्यांपैकी २ हजार ८४६ खात्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
दरम्यान, शासनाकडून रायगड जिल्ह्यासाठी १ हजार ८५९ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र कर्जावर मुद्दल व व्याजासह कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही दिला जात आहे.
जिल्ह्यात ४ हजार ३८६ खातेदारांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नाही, तर ५३७ खातेदार मयत आणि १४४ खातेदार अन्य जिल्ह्यातील असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी बँक शाखा, सेवा संस्था किंवा ग्रामपंचायतीतील यादी तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)