
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.) :
महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेची माहिती वारंवार मागण्यात आल्यानंतरही प्रशासनाकडून ती सादर करण्यात येत नसल्याने उद्धिग्न सभापतींनी बुधवारी आयोजित स्थायी समितीची सभा स्थगित केली. आता येत्या १७ ऑगस्टला ठेवण्यात आलेल्या तहकूब सभेत अतिरिक्त आयुक्तांनी परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिले आहेत. या मुद्द्यावर प्रशासनाची चांगलीच कोंडी होत असल्याने तहकूब सभेत काय अहवाल येतो, याकडे लक्ष वेधल्या गेले आहे. स्थायी समितीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत स्वच्छता कंत्राटाच्या भाग दोनला प्रशासकीय मंजुरी देण्याचा विषय प्रशासनाकडून पटलावर ठेवण्यात आला होता. यापूर्वीही हा विषय पटलावर होता व त्यावेळी समितीने निविदा प्रक्रियेची परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रशासनाकडून तो सादर करण्यात न आल्याने उद्विग्न झालेल्या सभापती अविनाश मार्डीकर यांनी सभाच स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी प्रशासकीय राजवटीत स्वच्छता कंत्राटाची निविदा घाईघाईने उरकण्यात आली, असा मुख्य आक्षेप आहे. ही निविदा दोन भागांत करण्यात आली असून भाग दोनमध्ये (पार्ट बी) घरोघरी दैनंदिन कचरा संकलनाचा कंत्राट आहे. तत्कालीन प्रशासकीय राजवटीत झोन क्र तीनच्या कंत्राटास तत्कालीन प्रशासकीय स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी उर्वरित चार झोनच्या कंत्राटास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केलेली नाही. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर गठित झालेल्या स्थायी समितीकडे आता चार झोनच्या कंत्राटास मंजुरी देण्याचा विषय प्रशासनाने मांडला आहे. त्याचवेळी स्थायी समितीने मागविलेली माहिती देण्यास प्रशासनाकडून (स्वच्छता विभाग) टाळाटाळ सुरू आहे. अखेर सभापती अविनाश मार्डीकर यांनी प्रशासनाने माहिती अहवाल सादर न केल्याने अखेरची मुदत देत सभा स्थगित करण्यात येत असल्याचा निर्णय दिला. यासोबत येत्या सोमवारी (ता. १७) तहकूब सभा आयोजित करण्यात येत असून त्या सभेत अतिरिक्त आयुक्तांनी हा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले. यामध्ये निविदाप्रक्रिया करताना काय चुका झाल्यात ते स्पष्ट करण्यास सांगण्यात आले असून करारनामा करताना काय अनियमितता झाली ते सुद्धा स्पष्ट करण्यास बजावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी