
लातूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)।
अहमदपूर-चाकूर तालुक्यातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि शैक्षणिक सुविधांशी संबंधित विविध विकासकामांना गती देण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पांचा नुकताच सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते ऊर्ध्व मानार प्रकल्प ते प्रस्तावित झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ४,३९१.५५ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या या योजनेमुळे अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सुमारे ८,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ३९ गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा शाश्वत लाभ मिळणार असून, उन्हाळ्यातील टँकरची टंचाई दूर होण्यास मदत होईल. तसेच शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.
सदर योजनेसाठी ५० दलघमी (१.७६ टीएमसी) पाणीवापरास मान्यता मिळालेली असून, प्रकल्पाच्या विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर आतापर्यंत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. अंतिम सर्वसाधारण आखणी आराखड्यासही मान्यता मिळाली असून सविस्तर संकल्पनाचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्णयानंतर ४,३९१.५५ कोटी रुपयांचा प्रशासकीय मान्यता प्रस्ताव दि. ९ जून २०२६ रोजी शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मान्यतेसाठीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
याच बैठकीत अहमदपूर येथे शासकीय मुलींच्या वसतिगृहासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही चर्चा झाली. व्हटी पाटबंधारे वसाहतीतील उपलब्ध जागेपैकी सुमारे ०.५७ हेक्टर जागा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या व नादुरुस्त इमारतींच्या जागेचा योग्य वापर करून मुलींच्या शासकीय वसतिगृहाची उभारणी करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी भूमिका सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मांडली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis