
रत्नागिरी, 13 ऑगस्ट (हिं.स.) । सकल हिंदू समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अखंड भारत संकल्प दिन शुक्रवारी, दि. १४ ऑगस्ट रोजी अखंड भारताचा संकल्प करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यलक्ष्मी चौक ते मारुती मंदिरपर्यंत मोटरसायकल फेरी व त्यानंतर स्वा. सावरकर नाट्यगृहात हिंदुत्ववादी नेते नीतेश राणे यांच्या उपस्थितीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४.३० वाजता लक्ष्मी चौक, गाडीतळ, रत्नागिरी येथून मोटारसायकल फेरी निघेल. मारुती आळी, जयस्तंभ, मारुती मंदिर मार्गे फिरून सावरकर नाट्यगृहात फेरीची सांगता होईल. त्यानंतर पावणेसहा वाजता प्रखर हिंदुत्ववादी नितेश राणे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आपणास करण्यात येत आहे.
प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या मनामध्ये फाळणीच्या वेदना व अखंड भारताचे स्वप्न हे असलेच पाहिजे. अखंड भारतातील अफगाणिस्तान इथे श्रीरामांची आई कैकयी यांची भूमी समजली जाते. तिबेट हे भगवान शिवाचे स्थान, नेपाळ येथे सीतामातेचा जन्म झाला, तसेच ते पशुपतिनाथचे स्थान आहे. भूतान हे शांतीधर्म आणि बौद्ध संस्कृतीची भूमी आहे. बांगलादेश भारतीय कला व दुर्गामातेची भूमी तर म्यानमार येथून बौद्ध धर्माचा विस्तार झाला. श्रीलंका रामायणाची अमरभूमी आहे. पाकिस्तानातून सिंधू सभ्यता उदयास आली. २७० वर्षांमध्ये भारताचे तेरा तुकडे झाले, भारताचे आताचे क्षेत्रफळ हे एकतृतीयांश एवढे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी अरविंद, प. पू. गोळवलकर गुरुजी इत्यादी राष्ट्रपुरुषांनी, तसेच ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान केले, त्यांनी भारत कधी खंडित होईल, असा विचार केला नव्हता. भारत एक प्राचीन राष्ट्र आहे, एक राष्ट्र, एक संस्कृती हा विचार मागे पडून नवराष्ट्र निर्मितीचा विचार पुढे कसा आला? भारताच्या मानबिंदूंसोबत तडजोड कशी झाली? तुष्टीकरण नव्हे तर विकृतीकरण कसे झाले? अखंड भारताची आवश्यकता काय? याबाबत श्री. राणे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
याकरिता १४ ऑगस्ट रोजी बहुसंख्येने सहभागी होऊन अखंड भारताचा संकल्प करूया. अखंड भारत हे एक स्वप्न नसून ध्येय आहे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी