
अकोला, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना आमदार साजिद खान पठाण यांनी दिल्या. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आ. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, मिरवणुकांच्या वेळी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच धारगड यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे आ. पठाण यांनी स्पष्ट केले.
खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीत प्रस्ताव
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून, सण-उत्सवाच्या काळात मिरवणुका आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेता रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा आणि खड्डे दुरुस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी सूचना करण्यात आली.
गांधीग्राम-अकोट फाईल मार्गावरील पथदिवे सुरू करण्याचे निर्देश
गांधीग्राम ते अकोट फाईल मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या मार्गावरील बंद असलेली लाईट व्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शांतता समितीच्या बैठकीनंतर पोलिसांचे नियोजन
सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असून, त्यासाठी आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. पोलिस प्रशासनाची शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली असून, त्यासोबतच आवश्यक त्या अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
‘दुरुस्तीच्या नावाखाली दीर्घकाळ वीज बंद नको’
सणांच्या काळात महावितरणकडून अनावश्यक लोडशेडिंग होऊ नये, तसेच दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित ठेवू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. आवश्यक दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
धारगड यात्रेसाठी स्वतंत्र नियोजन
धारगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा मार्गाची आवश्यक दुरुस्ती करावी, वनविभागाशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच पार्किंगची व्यवस्था शिस्तबद्ध पद्धतीने करावी, अशा सूचना देण्यात आल्या. भाविकांच्या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच यात्रास्थळी ॲम्ब्युलन्स सेवा सज्ज ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान वाहतूक वळविण्याची सक्ती
जुलूस किंवा मिरवणूक निघताना वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस विभागावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. संबंधित मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळवावी आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले.
उत्सवापुरती स्वच्छता नको; रोज शहर स्वच्छ ठेवा
शहरातील अस्वच्छतेबाबत आ. पठाण यांनी नाराजी व्यक्त केली. सण-उत्सवाच्या काळापुरती स्वच्छता मोहीम न राबवता शहराची दैनंदिन स्वच्छता कायम राखणे आवश्यक आहे. नागरिकांना अस्वच्छतेबाबत तक्रारी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित स्वच्छतेवर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
अकोटच्या जुलूसाच्या वेळेचा मुद्दा ऐरणीवर
अकोट शहरातील ईद निमित्त निघणाऱ्या जुलूसाच्या वेळेचा प्रश्नही बैठकीत चर्चेला आला. जुलूसासाठी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्याबाबत योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि नागरिकांच्या सुविधा यांचा समतोल राखून प्रशासनाने नियोजन करावे, असे आ. साजिद खान पठाण यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे