लाल किल्ला स्फोटात अल-कायदा संघटनेचा सहभाग; यूएनएससीच्या अहवालातून खुलासा
नवी दिल्ली , 13 ऑगस्ट (हिं.स.)।दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या स्फोटाबाबत मोठा खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)च्या एका अहवालात या हल्ल्यामध्ये भारतीय उपखंडातील अल-कायदा (एक्यूआईएस) या दहशतवादी संघटन
लाल किल्ला स्फोटात अल-कायदा संघटनेचा सहभाग; यूएनएससीच्या अहवालातून खुलासा


नवी दिल्ली , 13 ऑगस्ट (हिं.स.)।दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या स्फोटाबाबत मोठा खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)च्या एका अहवालात या हल्ल्यामध्ये भारतीय उपखंडातील अल-कायदा (एक्यूआईएस) या दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता.

यूएनएससीच्या विश्लेषणात्मक सहाय्य आणि निर्बंध निरीक्षण पथकाचा हा 38वा अहवाल असून, तो सोमवारी जारी करण्यात आला.या अहवालात म्हटले आहे की, एक्यूआईएस आता विखुरलेली संघटना राहिलेली नसून ती प्रादेशिक दहशतवादी संघटना म्हणून विस्तारत आहे. अहवालानुसार, एक्यूआईएसने आपल्या कारवायांसाठी साहित्य पुरवठा आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित नेटवर्क तयार केले आहेत. मोठ्या गटांऐवजी ही संघटना आता लहान आणि स्वतंत्र सेलच्या माध्यमातून काम करत आहे. अहवालात नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्यासाठी एक्यूआईएसला स्पष्टपणे जबाबदार ठरवण्यात आले आहे. तसेच एक्यूआईएस बांगलादेशचा वापर करून तेथे आपले दहशतवादी तळ उभारण्याचा प्रयत्न करत असल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासाठी एक्यूआईएसचे नाव समोर येणे महत्त्वाचे आहे. कारण यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आणखी एका अहवालात या हल्ल्याचे संबंध जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याचे नमूद करण्यात आले होते.यूएनएससीच्या निरीक्षण पथकाच्या 37व्या अहवालानुसार, एका सदस्य देशाने दिलेल्या माहितीत जैश-ए-मोहम्मदने अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले होते. त्याच संघटनेचा नोव्हेंबर 2025 मध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्याशी संबंध असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. म्हणजेच, मागील अहवालात या हल्ल्याचा संबंध जैश-ए-मोहम्मदशी जोडण्यात आला होता, तर आता नव्या अहवालात हा हल्ला एक्यूआईएसशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी सुमारे सात वाजता हा स्फोट झाला होता. लाल किल्ल्याजवळून जात असलेल्या हुंडाई i20 कारमध्ये जोरदार स्फोट झाला होता. ही कार उमर नबी चालवत होता. तो आत्मघाती हल्लेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला, तर दोन डझनहून अधिक जण जखमी झाले होते.

यूएनएससीच्या ताज्या अहवालात अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयएसआयएल)शी संबंधित संघटनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, अल-कायदा आणि आयएसआयएलशी संबंधित संघटना गेल्या अनेक वर्षांपासून रासायनिक आणि जैविक शस्त्रे तयार करण्यात रस दाखवत आहेत. मात्र, अशी शस्त्रे तयार करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही.

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अशा शस्त्रांशी संबंधित सूचना दहशतवादी संघटनांमध्ये ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. अहवालात आयएसआयएलच्या इंग्रजी भाषेतील एका नियतकालिकाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या नियतकालिकात फेब्रुवारीमध्ये बोटुलिनम टॉक्सिन आणि सायनाइडशी संबंधित माहिती प्रकाशित करण्यात आली होती. निरीक्षण पथकाने असेही म्हटले आहे की, आयएसआयएल-के ला रिसिन या विषारी पदार्थामध्ये विशेष रस आहे. गेल्या 12 महिन्यांत या संघटनेने रिसिन तयार करण्यासंदर्भातील सूचनाही शेअर केल्या आहेत.

दरम्यान, नोव्हेंबर 2025 मध्ये लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्राची दखल घेण्यासाठी 27 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. एनआयएने या प्रकरणात 11 आरोपींविरोधात तब्बल 7,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या हल्ल्यामागे या आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. अभियोजन पक्षाची तक्रारही हजारो पानांची असून, त्यात 580 हून अधिक साक्षीदारांचा उल्लेख करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande