
यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सव तसेच श्रावण महिन्यातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर मूर्ती आणि पूजा साहित्याची दुकाने थाटली जातात. त्यामुळे होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मूर्ती व पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी स्वतंत्र विक्री केंद्र उभारावे, अशी मागणी समस्या निराकरण समाधान ग्रुपच्या वतीने नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात ग्रुपच्या सदस्यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हनुमान मंदिर, गांधी चौक, खडकपुरा, छत्रपती शिवाजी चौक, प्रमुख बाजारपेठ तसेच शहरातील विविध रस्त्यांवर उत्सव काळात रस्त्यालगत मूर्ती व पूजा साहित्याची दुकाने लावली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.
ही परिस्थिती लक्षात घेऊन कॉटन मार्केट यार्ड, पुसद रोड, रेस्ट हाऊससमोरील सर्कस ग्राउंड किंवा महागाव रोड परिसरातील योग्य जागा निश्चित करून तेथे नगरपरिषदेच्या माध्यमातून विक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्टॉल उभारावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अंदाजे १० बाय २० फूट आकाराचे स्टॉल नियमानुसार भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
दरवर्षी फटाका विक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था केली जाते. त्याच धर्तीवर मूर्ती व पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी स्वतंत्र विक्री केंद्र निर्माण केल्यास शहरातील मुख्य रस्ते मोकळे राहतील, वाहतूक कोंडी कमी होईल तसेच आपत्कालीन वाहनांना सुरळीत मार्ग उपलब्ध राहील. नागरिकांनाही आवश्यक पूजा साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या समस्येबाबत यापूर्वी माजी नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. मात्र, अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
यावर्षी उत्सव सुरू होण्यापूर्वीच नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन करून मुख्य चौकांमध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे दुकाने थाटली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना विजय आडे, डॉ. राम राठोड, दीपक ठाकरे, गणेश शिंदे, बंडू पाध्ये, सुरेश वाघ, प्रशांत आयाचित, अनिल देशपांडे यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी