
अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार नोंद असलेल्या मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
परभणी, 13 ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार नोंद असलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीसोबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी संकेतस्थळावर जाऊन यादी तपासावी आणि आपले नाव चुकीने या यादीत समाविष्ट झालेले नाही, याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एखाद्या पात्र मतदाराचे नाव चुकीने या यादीत समाविष्ट असल्याचे आढळल्यास संबंधित बीएलओ, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करून नावाबाबत योग्य ती कार्यवाही करून घ्यावी.
पात्र मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये आणि कोणताही नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व मतदारांनी यादीची तातडीने तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
अधिकृत संकेतस्थळ : parbhani.gov.in
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis