बीडमध्ये 'खेलो इंडिया' अंतर्गत कबड्डी प्रशिक्षकाची नियुक्ती; १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्जांचे आवाहन
बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या ''खेलो इंडिया'' योजनेअंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १००० केंद्रे निर्माण करण्यात येत आहेत. या अंतर्गत बीड जिल्ह्याला कबड्डी या खेळाचे केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली अ
खेलो इंडिया


बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या 'खेलो इंडिया' योजनेअंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १००० केंद्रे निर्माण करण्यात येत आहेत. या अंतर्गत बीड जिल्ह्याला कबड्डी या खेळाचे केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली असून, जिल्हा क्रीडा संकुल येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर प्रशिक्षण देण्यासाठी अर्हता प्राप्त प्रशिक्षकाची मानधन तत्त्वावर नियुक्ती करावयाची असून, पात्र उमेदवारांकडून १४ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील उत्कृष्ट १५ मुले व १५ मुली अशा एकूण ३० खेळाडूंची निवड करून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे आणि प्रतिभावंत खेळाडू तयार करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने निवड होणाऱ्या प्रशिक्षकाची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर केली जाणार असून, प्रति महिना २५ हजार रुपये मानधन दिले जाईल.

प्रशिक्षकासाठी आवश्यक पात्रता व अटी:

* वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे. (अतिउच्च कामगिरी किंवा गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने ५० वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी देण्यात येईल).

* क्रीडा अर्हता व अनुभव:

* ऑलिम्पिक / एशियन गेम्स / जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धांमध्ये सहभाग किंवा पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव.

* जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा किंवा संबंधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू प्रशिक्षणाचा अनुभव.

* राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी प्रशिक्षणाचा अनुभव.

* एनआयएस (NIS) पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेव्हल कोर्सेस किंवा बीपीएड/एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव.

* राज्यस्तर खेळाडू असल्यास बीपीएड-एमपीएडसह किमान १० वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव आवश्यक.

अर्ज प्रक्रिया आणि संपर्क:

उपरोक्त पात्रता प्राप्त उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्वाक्षरी केलेला अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन प्रमुख रेवननाथ शेलार (मो.क्र. ९०७५४७६७९१) आणि सतीश राठोड (मो.क्र. ९९२३०१९३५३) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande