पुरातत्त्वशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रत्नागिरीत संधी
रत्नागिरी, 13 ऑगस्ट (हिं.स.) । कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ‘पुरातत्त्वशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ (Three-Month Certificate Course in Archaeolog
पुरातत्त्व शास्त्र


रत्नागिरी, 13 ऑगस्ट (हिं.स.) । कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ‘पुरातत्त्वशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ (Three-Month Certificate Course in Archaeology) आयोजित करण्यात आला आहे.

हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून, नोकरदार, शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दर शनिवार व रविवारी वर्ग घेण्यात येणार आहेत. वर्ग मराठी माध्यमातून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने आयोजित केले जाणार आहेत.

अभ्यासक्रमामध्ये पुरातत्त्वशास्त्राची ओळख, कालनिर्णयाच्या पद्धती, उत्खनन तंत्रे, पुरातत्त्वीय वस्तूंचे संवर्धन व संग्रहालयांची भूमिका, प्रागैतिहासिक व आद्य-ऐतिहासिक काळ, अश्मयुगीन संस्कृती, भारतातील महत्त्वाची प्रागैतिहासिक स्थळे, सिंधू संस्कृती, नगररचना, व्यापार, धर्म तसेच लोहयुगीन संस्कृती यांचा समावेश आहे.

भारतीय मंदिर स्थापत्यशैलीअंतर्गत मंदिरांचा उगम व विकास, नागर, द्रविड व वेसर शैली, शिल्पशास्त्रावरील ग्रंथ तसेच विशेषतः कोकणातील मंदिर परंपरेचा अभ्यास केला जाणार आहे. यासोबतच मूर्तिशास्त्र व धर्म, हिंदू देवदेवतांचे मूर्तिशास्त्र, बौद्ध व जैन मूर्तिशास्त्र तसेच लोकपरंपरांचाही अभ्यासक्रमात समावेश आहे.

शिलालेखशास्त्र आणि नाणकशास्त्र या विषयांत प्राचीन शिलालेख, ताम्रपट, वीरगळ, ब्राह्मी लिपीची ओळख तसेच प्राचीन ते मध्ययुगीन नाण्यांचा इतिहास व त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वर्गातील सैद्धांतिक शिक्षणापुरता तो मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना व्याख्यानांसोबत प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव (Field Experience) देखील दिला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व कोकणच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

इतिहास व पुरातत्त्व विषयांचे विद्यार्थी, इतिहासप्रेमी तसेच रत्नागिरीतील वारसा आणि संस्कृतीचे अभ्यासक या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. अभ्यासक्रमाचे शुल्क सर्वसामान्यांसाठी १,००० रुपये, तर विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे शुल्क ८०० रुपये आहे. इच्छुक उमेदवारांनी १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रवेशासाठी नोंदणी करावी. अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश शुल्क भरणे अनिवार्य आहे.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र (भारतरत्न डॉ. पी. व्ही. काणे संस्कृत अध्ययन केंद्र), मुख्य बस स्थानकासमोर, रत्नागिरी येथे अधिक माहिती उपलब्ध असून, इच्छुकांनी ऋत्विज आपटे (७५०७१३४६२४), कु. कश्मिरा दळी (९०२८४९४१९९) अथवा ओंकार आठवले (९४०३२०५८९०) यांच्याशी संपर्क साधावा. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी व कोकणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असून, रत्नागिरीतील स्थानिक इतिहास, पुरातत्त्व, वारसा आणि संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande