
परभणी, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम’ बी. रघुनाथ सभागृहात उत्साहात पार पडला. देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी सभागृहात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजु लाला आणि समाजकल्याण सभापती राजेश रणखांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी आणि ड. केकाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मॅजिक व्हाईस साउंडचे अजमद खान व त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या बहारदार देशभक्तीपर गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आर. के. डान्सच्या कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. रोशन खा मोहल्ला येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतावर आकर्षक नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी ‘नन्हा मुन्ना राही हूँ’ हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी ‘शूर आम्ही सरदार’ तसेच ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ ही देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी यांनी ‘मेरे देश प्रेमियों, ओ...’ हे गीत सादर करत कार्यक्रमात विशेष रंग भरला.
यावेळी सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजु लाला म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले. समाजकल्याण सभापती राजेश रणखांबे यांनी समाजकल्याण विभागाच्या वतीने महिला तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, कलाकार आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis