
रत्नागिरी, 13 ऑगस्ट (हिं.स.) । ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
अभिमानाने फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज आणि भारत माता की जय.. वंदे मातरम.. च्या जयघोषाने संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेले. या मिरवणुकीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खेड तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक, युवती, शहरातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेडचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजपा नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद ऊर्फ दादू नांदगावकर, तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी, हा या मिरवणुकीचा मुख्य उद्देश आहे, असे ऍड. वैभव खेडेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी