नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला
बादल यांच्या हाताला दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.) : शिरोमणी अकाली दलचे (बादल) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज,गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे हल्ला करण्यात आला. ऐतिहासिक गुरुद्वारा
सुखबीर सिंग बादल (संग्रहित फोटो)


बादल यांच्या हाताला दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.) : शिरोमणी अकाली दलचे (बादल) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज,गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे हल्ला करण्यात आला. ऐतिहासिक गुरुद्वारा साहिबच्या बाहेर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल गुरुद्वारा साहिबमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहनातून उतरत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर सुखबीर सिंग बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीची ओळख आणि त्याने कोणत्या उद्देशाने हा हल्ला केला, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.घटनेनंतर गुरुद्वारा परिसर तसेच आसपासच्या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्या दुखापतीची नेमकी स्थिती आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

अमृतसरमध्येही झाला होता जीवघेणा हल्ला

सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वी 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसर येथील श्री हरमंदिर साहिबच्या बाहेरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी अकाल तख्त साहिबने सुनावलेल्या धार्मिक शिक्षेअंतर्गत ते सेवादार म्हणून सेवा बजावत होते.

बादल हे व्हीलचेअरवर बसून हातात भाला घेऊन पहारा देत असताना नारायण सिंग चौरा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बादल या हल्ल्यातून बचावले. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेतले होते.अमृतसरच्या घटनेवेळी सुखबीर सिंग बादल हे 2007 ते 2017 या कालावधीतील अकाली दल सरकारच्या कार्यकाळात झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून अकाल तख्त साहिबने सुनावलेल्या धार्मिक शिक्षेअंतर्गत सेवा बजावत होते. त्यांनी श्री हरमंदिर साहिबच्या बाहेर सेवादार म्हणून सेवा केली होती. गोळीबाराच्या प्रयत्नानंतरही त्यांनी आपली धार्मिक सेवा सुरू ठेवली आणि त्यानंतर इतर गुरुद्वारांमध्येही सेवा पूर्ण केली.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नांदेडमधील ताज्या घटनेनंतर सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. धार्मिक स्थळाबाहेर त्यांच्यावर पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा सुरू झाली आहे. सध्या पोलीस तपास आणि रुग्णालयाकडून मिळणाऱ्या वैद्यकीय अहवालानंतरच या हल्ल्याचे नेमके स्वरूप आणि पार्श्वभूमी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande