नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या क्षमतांची ओळख आणि सहभागाला प्रोत्साहन आवश्यक : आनंद मापुस्कर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून सक्षम शिक्षक, समर्थ विद्यार्थी घडविण्यावर भर चंद्रपूर, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. सक्षम शिक्षकांच्या माध्यमातूनच सक्षम आणि आत्मविश्वासू विद्य
नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या क्षमतांची ओळख आणि सहभागाला प्रोत्साहन आवश्यक : आनंद मापुस्कर


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून सक्षम शिक्षक, समर्थ विद्यार्थी घडविण्यावर भर

चंद्रपूर, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. सक्षम शिक्षकांच्या माध्यमातूनच सक्षम आणि आत्मविश्वासू विद्यार्थी घडू शकतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर, विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण अभ्यासक आनंद मापुस्कर यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर व्यापक विचारमंथन करण्यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० : सक्षम शिक्षक, समर्थ विद्यार्थी’ या विषयावर गुरुवारी सरदार पटेल महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोंडवाना विद्यापीठ, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्ययन केंद्र आणि सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, डॉ. किरण कापगते, डॉ. हिमगौरी देशपांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत दोनतुलवार, सिनेट सदस्य संजय रामगीरवार, प्रस्तावक यश बांगडे, डॉ. योगेश दुधपचारे तसेच अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. मनीष देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

एनईपीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मापुस्कर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण न देता त्यांच्यामध्ये विचारशक्ती, आकलन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना शिक्षणातील सकारात्मक बदलांमुळेच सामाजिक व्यवस्था अधिक सक्षमपणे टिकून राहू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांनी केले. संचालन उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले, तर आभार प्रा. चिकटे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजलक्ष्मी कुलकर्णी यांनी करून दिला.

शिक्षणातूनच विकसित भारताची निर्मिती शक्य : डॉ. श्रीराम कावळे

गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली असून ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांचा समन्वय साधणारे शिक्षणच देशाच्या प्रगतीला गती देऊ शकते, असे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी सांगितले. सक्षम शिक्षक, सक्षम विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, ज्ञानसमृद्ध आणि विकसित भारताची निर्मिती शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तसेच शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande