
सेंट लुईस, १३ ऑगस्ट (हिं.स.) भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याची सिंकफील्ड कप २०२६ मधील अपराजित सुरुवात तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून झालेल्या पराभवामुळे संपुष्टात आली. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना, प्रज्ञानानंद रोमानियाच्या सुपर चेस क्लासिक चॅम्पियन कीमरकडून पराभूत झाला.
या पराभवामुळे प्रज्ञानानंद १.५ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर घसरला आहे. तो अमेरिकेचा फॅबियानो कारुआना, जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर आणि अमेरिकेचा सॅम सेव्हियन यांच्यासोबतही चौथ्या स्थानावर बरोबरीत आहे. अमेरिकेच्या वेस्ली सो याने आपलाच देशबांधव फॅबियानो कारुआनाला पराभूत करून स्पर्धेत आघाडी घेतली आहे. सो आता २.५ गुणांवर आहे.
फ्रान्सचा मॅक्सिम वाशियर-लाग्रेव्ह आणि अमेरिकेचा लेव्हॉन अरोनियन यांनी अनुक्रमे झावोखिर सिंदारोव्ह आणि जॉर्डन व्हॅन फोरिस्ट यांच्याविरुद्धचे सामने बरोबरीत सोडवले. तीन फेऱ्यांनंतर दोन्ही बुद्धिबळपटू प्रत्येकी दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर बरोबरीत आहेत.
केर्न्स कपमध्ये दिव्या तिसऱ्या स्थानावर
दरम्यान, भारताच्या दिव्या देशमुखने केर्न्स कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्वित्झर्लंडच्या ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा कोस्टेनियुकला पराभूत करून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. या विजयामुळे दिव्याच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. दुसरीकडे, कोस्टेनियुकला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून ती गुणतालिकेत मागे पडली आहे. चीनची टॅन झोंगयी आणि अमेरिकेची ॲलिस ली प्रत्येकी २.५ गुणांसह पहिल्या स्थानावर बरोबरीत आहेत. दिव्या आता संयुक्त अव्वल स्थानापासून केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे