
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी
आरोपांची सत्यता अधिकृत तपासातूनच स्पष्ट होणार
रायगड, १३ ऑगस्ट (हिं.स.) : रोहा तालुक्यात मागील काही वर्षांत विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेत कथितरीत्या मोठी वाढ झाल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांमुळे तालुक्यात चर्चेला आणि संतापाला उधाण आले आहे.
रोहा तालुक्यात औद्योगिक तसेच पर्यटन क्षेत्राचा विस्तार झाल्याने जमिनीच्या व्यवहारांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांत फार्म हाऊस, आलिशान बंगले तसेच मोठ्या प्रमाणातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची चर्चा सुरू आहे. या व्यवहारांमध्ये काही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सन २००० पासून तालुक्यातील विविध शासकीय विभागांत सेवा बजावलेल्या काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून किंवा बेकायदेशीर मार्गाने मालमत्ता जमविली आहे का, याची चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रोहा परिसरातील महत्त्वाच्या जमिनी, फार्म हाऊस, आलिशान मालमत्ता तसेच विविध गुंतवणुकींची चौकशी करताना संबंधित व्यक्तींच्या नावासोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचाही तपास करावा, अशी मागणी होत आहे. तसेच मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, उत्पन्नाचे स्रोत आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे. कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक चौकशी सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महसूल विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि संबंधित तपास यंत्रणांनी या तक्रारींची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)