
पुणे, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्याची मोक्याची जागा ट्रस्टला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेच्या हस्तांतरणास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना-हरकत’ दर्शविली असून, त्यासाठीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या सध्याच्या जागेवर ट्रस्टच्या मंदिराचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यासाठी नवीन आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या पोलिस ठाण्याच्या आवारातील महत्त्वाच्या कार्यालयांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागा दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या ताब्यात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर गृह विभागाकडून पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.मंदिर परिसरात भाविकांची वाढती गर्दी आणि उपलब्ध जागेची मर्यादा लक्षात घेऊन मंदिर विस्ताराचा विषय चर्चेत आहे. त्यासाठी लागणारी मोक्याची जागा उपलब्ध झाल्यास मंदिराच्या विस्ताराला चालना मिळू शकते. मात्र, जागेच्या अंतिम हस्तांतरणासाठी गृह विभागाची मंजुरी तसेच संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु