गडचिरोली - आदिवासी गर्भवतीचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा
गडचिरोली., 13 ऑगस्ट (हिं.स.) गडचिरोलीच्या अहेरीत आरोग्य व्यवस्थेची संतापजनक अवस्था समोर आली आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी गर्भवतीचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी संपल्या न
गडचिरोली - आदिवासी गर्भवतीचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा


गडचिरोली., 13 ऑगस्ट (हिं.स.)

गडचिरोलीच्या अहेरीत आरोग्य व्यवस्थेची संतापजनक अवस्था समोर आली आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी गर्भवतीचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी संपल्या नाहीत. दोन शासकीय रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावामुळे मृतदेह तब्बल १४ तास शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आला. अखेर पत्रकारांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाची यंत्रणा हलली आणि दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.

भामरागड येथील ३४ वर्षीय जन्नी पुसू नैताम यांना ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

अहेरीकडे नेत असतानाच वाटेत जन्नी नैताम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह प्रथम अहेरीतील महिला व बाल रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, तेथे शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

मात्र, हे प्रकरण महिला व बाल रुग्णालयाशी संबंधित असल्याचे सांगत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास असमर्थता दर्शवली. दोन रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या टोलवाटोलवीमुळे मृतदेह तब्बल १४ तास शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत राहिला.

दरम्यान, स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर विशेष डॉक्टरांची टीम अहेरीकडे रवाना करण्यात आली. मात्र, त्यांनाही पोहोचण्यास विलंब झाल्याने अखेर दुपारी सुमारे २ वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही नातेवाइकांना १४ तास शवविच्छेदनासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि दोन शासकीय रुग्णालयांमधील समन्वयाचा अभाव यामुळे गर्भवतीला वेळेवर उपचार मिळाले का, याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

रुग्ण जीवानिशी गेला, मात्र मृत्यूनंतरही कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय हेलपाटे आणि वेदना आल्या. आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करून रुग्णांना वेळेवर उपचार आणि मृत्यूनंतर सन्मानजनक प्रक्रिया मिळणार तरी कधी, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande