


रायगड, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे आणि जनजागृतीला व्यापक स्वरूप देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलसंधारण सप्ताह व अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील, अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अन्य अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
२१ ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर’ जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वॉकेथॉनच्या मार्गावरील वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, पिण्याचे पाणी व स्वच्छता यासह आवश्यक सुविधांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
युवकांसाठी रील स्पर्धा: जल व मृदसंधारणाच्या चळवळीत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी १५ ते १९ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ‘रील फॉर सोइल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. महाविद्यालये, युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेची व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘एक गाव, एक जलसंधारण संकल्प’, गावोगावी नाले, बंधारे, तलाव आणि पाणलोट क्षेत्राच्या संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आणि पाणी बचतीचे नियोजन आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. ‘एक गाव, एक जलसंधारण संकल्प’ या भावनेतून कामे केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अभियानाच्या कालावधीत शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रम, वृक्षारोपण, जलस्रोत स्वच्छता आणि लोकसहभागातून जलसंधारण कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)