अमरावती : तपोवन शाळेच्या विद्यार्थिनींसाठी पहिले ‘पिंक कॉटेज’
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आरोग्यदायी वातावरण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून तपोवन येथील महामना मालवीय विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी जिल्ह्यातील पहिल
तपोवन शाळेच्या विद्यार्थिनींसाठी जिल्ह्यातील पहिले ‘पिंक कॉटेज’


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आरोग्यदायी वातावरण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून तपोवन येथील महामना मालवीय विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी जिल्ह्यातील पहिले स्वतंत्र ‘पिंक कॉटेज’ साकारण्यात आले आहे. या कॉटेजचा लोकार्पण सोहळा पोलिस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. ग्रामीण, आदिवासी व कष्टकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा या उदात्त हेतूने विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवनच्या माध्यमातून महामना मालवीय विद्यालयाची वाटचाल सुरू आहे.

या महामना विद्यालयातील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासात शिक्षणासोबत आरोग्य आणि स्वच्छतेलाही समान महत्त्व मिळावे, या उद्देशाने तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पहिली ‘पिंक कॉटेज’ची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे, सदर पिंक कॉटेजसाठी तब्बल चार हजार चौरस फूट जागेवर चार खोल्यांचे कॉटेज उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहे. तपोवनमधील वंदनीय श्रीसंत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई होते. उद्घाटक पोलिस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, विशेष अतिथी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांगडिया, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रदीप बाजड, सामाजिक कार्यकर्ते देविदास साहू, एक्सेल फाउंडेशनचे संचालक शोएब खान, अंकिता चौरसिया, तपोवनचे सचिव सहदेव गोळे, महामना मालवीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा सदांशिवे, उपसचिव ऋषिकेश देशपांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. संजय रेड्डी, उपअधीक्षक योगेश करडे आदी उपस्थित होते. पिंक कॉटेजच्या लोकार्पणानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच विद्यालयासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटक पोलिस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षण, आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आता आमच्या मुलींना आरोग्याची चिंता न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल आणि स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार होण्याचा आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक तपोवनचे उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांनी, तर संचालन माधुरी सहारे यांनी केले. आभार उपाध्यक्ष योगेश करडे यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande