कोल्हापूर - नशामुक्त युवा कार्यक्रमात स्काऊटस व गाईडस यांची शपथ
कोल्हापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक युवक दिनाच्या औचित्याने कोल्हापूर भारत स्काऊट आणि गाईड मेरी वेदर मैदान येथील कार्यालयाच्यावतीने नशामुक्त युवा व विकसीत भारत याअंतर्गत नशामुक्त युवा मार्गदर्शन व समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती
मानसोपचार समुपदेशक योगिनी पांडव आणि स्काऊट, गाईड


कोल्हापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक युवक दिनाच्या औचित्याने कोल्हापूर भारत स्काऊट आणि गाईड मेरी वेदर मैदान येथील कार्यालयाच्यावतीने नशामुक्त युवा व विकसीत भारत याअंतर्गत नशामुक्त युवा मार्गदर्शन व समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय कोल्हापूर येथील मानसोपचार समुपदेशक माहेश्वरी मंगरूळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित स्काऊट आणि गाईड यांना व्यसन व नशे विषयी व त्याच्या दुष्परीणामाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. व्यसनाचे दुष्टचक व त्यामुळे व्यक्तीचे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान, अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता व सोशल मिडीयाची वाढती अधिनता या विषयी मार्गदर्शन केले.

मानसोपचार समुपदेशक योगिनी पांडव यांनीही स्काऊट गाईड यांना व्यसनाचा प्रतिबंध व उपचाराविषयी माहिती दिली. मानसिक आरोग्यासाठी वेळीच उपचार होणे आवश्यक असल्याने स्वतःच्या वर्तनाच्या आत्मनिरीक्षणाची गरज त्यांनी सांगितली.

माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनीही निरोगी मन व निरोगी शरीराचे महत्व सांगितले. स्काऊट आणि गाईड हे सेवा प्रदान करणारे व सामाजिक भान जपणारे असतात. तेव्हा घरातील, परिसरातील व्यसनी व्यक्तींना नशा व व्यसनापासून दूर राहण्यास प्रेरीत करण्याबाबत त्यांनी सांगितले. मानसोपचार समुपदेशक अनिल कांबळे यांनी नशामुक्त राहण्याचा संकल्प करून शपथ दिली.

कार्यक्रमास देवी पार्वती हायस्कूल वडणगे, श्री दत्ता बाळ इंग्लिश मिडीयम स्कूल, कै य. भा. पाटील विद्यालय कसबा बावडा, विमला गोयंका इंग्लिश मीडीयम स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, सेंट झेवियर्स स्कूल व राधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम या शाळांमधील 142 स्काऊट गाईड व त्यांचे 11 शिक्षक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande