
परभणी, 13 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेतीला पूरक पशुपालन व्यवसायातून उत्पन्नवाढ साधावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज येथे केले.
वालूर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी उदय जाधव, तहसीलदार शविाजी मगर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मनोज घाटे, सहायक आयुक्त डॉ. दीपक धर्माधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमती साक्षी साडेगावकर, डॉ. आशिष डख, पंचायत समिती सभापती गजानन डोंबे, सदस्य गणेश मुंढे, शिवराम कदम, दीना मगर, वालूरचे सरपंच संजय साडेगावकर, पशुधन अधिकारी (विस्तार) डॉ. प्रकाश सावने, सुनील हट्टेकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, कृषिप्रधान देशात बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यांसारखे पूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेळीच्या दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ, चीज, तूप आदी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळवावे. यासाठी पशुपालक उद्योजकांनी योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी पशुधन व्यवसायातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी आयोजकांना दिल्या. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 950 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis