
रायगड, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी अलिबाग पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
राज्यभरातील मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ एकाचवेळी आयोजित करण्यात येत असल्याने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ ते ९.३५ या कालावधीत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एखाद्या शासकीय कार्यालयाला किंवा संस्थेला स्वतंत्र ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास तो सकाळी ८.३५ वाजण्यापूर्वी किंवा ९.३५ वाजल्यानंतर आयोजित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत.
मुख्य शासकीय समारंभासाठी जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्था, अधिकारी-कर्मचारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलीस मुख्यालय मैदानावर होणाऱ्या या मुख्य शासकीय समारंभासाठी आवश्यक तयारी करण्यात येत असून, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)