पीएमकेएसवाय 2.0 अंतर्गत 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्याची नवी दिशा
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटक (WDC-PMKSY 2.0) मधील अंबड प्रकल्प क्रमांक 1 अंतर्गत सन 2024-25 मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला चांगले यश मिळाले आहे. या
पीएमकेएसवाय 2.0 अंतर्गत 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्याची नवी दिशा


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.) :

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटक (WDC-PMKSY 2.0) मधील अंबड प्रकल्प क्रमांक 1 अंतर्गत सन 2024-25 मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला चांगले यश मिळाले आहे. या उपक्रमातून 65 शेतकऱ्यांच्या 51.60 हेक्टर क्षेत्रावर तब्बल 23 हजार 790 फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला शाश्वत, अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक शेतीची जोड मिळाली आहे.

रोहिलागड, बदापूर, आवा, अंतरवाला, खेडगाव, चिकनगाव, कौचलवाडी तसेच इतर पाणलोट समिती क्षेत्रातील गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारणाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे संवर्धन, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीचा लाभ मिळत आहे.

पाच प्रकारच्या फळझाडांची लागवड

उपक्रमांतर्गत उच्चमूल्य फळपिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये डाळिंबाची 12,709, मोसंबीची 5,942, आंब्याची 3,920, सीताफळाची 720 आणि पेरूची 499 रोपे, अशी एकूण 23,790 रोपांची लागवड करण्यात आली. या फळबागांसाठी योजनेअंतर्गत 43.06 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळण्यासाठी या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळत असून, भविष्यात त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी

फळबाग लागवड ही एकदाच होणारी प्रक्रिया नसून वर्षभर देखभालीची आवश्यकता असते. छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन, औषध फवारणी, काढणी, वर्गीकरण आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविणे अशा विविध टप्प्यांवर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

विशेषतः महिलांनाही फळबागांच्या देखभाल आणि काढणीच्या कामांमध्ये रोजगार मिळत असल्याने ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाला हातभार लागत आहे. गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत होत असल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरणाला चालना

फळबागांमुळे जमिनीवर कायमस्वरूपी हिरवे आच्छादन तयार होत असल्याने मातीची धूप कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सुपीक मातीचे संरक्षण होऊन जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.

पाणलोट विकासाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. परिणामी भूजल पुनर्भरणाला चालना मिळून विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

23,790 झाडांमुळे पर्यावरणालाही फायदा

फळबाग लागवडीचा फायदा केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. 23,790 फळझाडांमुळे परिसरातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. झाडांमुळे मातीचे संरक्षण, जैवविविधतेला चालना आणि कार्बन शोषणास हातभार लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जलसंधारणासोबत फळबागेची यशस्वी

सांगड

अंबड प्रकल्प क्रमांक 1 मधील हा उपक्रम केवळ फळझाडे लावण्यापुरता मर्यादित नसून जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतकरी उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांना एकत्रितपणे पुढे नेणारा उपक्रम ठरत आहे.

पाणलोट क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन व शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. पाणी साठे आणि झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनवाढीची आशा निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला झाला आहे. पीएमकेएसवाय 2.0 अंतर्गत अंबड प्रकल्पातील फळबाग लागवड ही जलसंधारण आणि शाश्वत शेतीची प्रभावी सांगड घालणारी यशस्वी वाटचाल ठरत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande