गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा २० ते २५ टक्के वाढ; कच्चा माल, मजुरी महागली
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा महिना उरल्याने पुण्यातील पेठांसह उपनगरांमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत असून, गेल्या दहा महिन्यांपा
Ganpati


पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा महिना उरल्याने पुण्यातील पेठांसह उपनगरांमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत असून, गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मूर्तीनिर्मितीच्या कामाला आता वेग आला आहे.

यंदा गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग, थिनर, वीज, वाहतूक आणि कामगारांची मजुरी यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ करावी लागणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी कारखान्यांमध्ये मूर्तींना रंगकाम, सजावट आणि अंतिम रूप देण्याची कामे वेगाने सुरू आहेत. विविध आकार आणि आकर्षक रूपातील मूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू असून, भाविकांकडूनही मूर्तींची आगाऊ मागणी केली जात आहे.गेल्या तीन-चार वर्षांत घरगुती गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचे पाच गणपती तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या मूर्तींच्या प्रतिकृतींना मोठी मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

पारंपरिक रेखीवपणा, प्रसन्न मुद्रा आणि पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मूर्तींना भाविकांची विशेष पसंती मिळत आहे.पुण्यातील वाढती फ्लॅट संस्कृती आणि घरांमधील उपलब्ध जागेचा विचार करता मोठ्या मूर्तींपेक्षा एक ते दोन फूट उंचीच्या गणेशमूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडूनही घरगुती गणेशोत्सवासाठी विविध आकारांतील आकर्षक मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande