टी२० क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बॅकफूटवर गेले आहे: हरभजन सिंग
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.)गेल्या काही वर्षांपासून टी२० फॉरमॅटवर अनेक प्रमुख व्यक्तींकडून टीका होत आहे. कसोटी क्रिकेटचा घसरलेला दर्जा असो, एकदिवसीय सामन्यांची घटती लोकप्रियता असो किंवा इतर काहीही असो, विविध समस्यांसाठी टी२० ला जबाबदार धरले जात आह
हरभजन सिंग


नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.)गेल्या काही वर्षांपासून टी२० फॉरमॅटवर अनेक प्रमुख व्यक्तींकडून टीका होत आहे. कसोटी क्रिकेटचा घसरलेला दर्जा असो, एकदिवसीय सामन्यांची घटती लोकप्रियता असो किंवा इतर काहीही असो, विविध समस्यांसाठी टी२० ला जबाबदार धरले जात आहे. आणि आता माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही यात आपले मत मांडले आहे. जगभरातील प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या टी२० लीगची वाढती लोकप्रियता द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अंतास कारणीभूत ठरू शकते, असे तो म्हणाला. एका पॉडकास्ट मुलाखतीत, वाढत्या टी२० लीगमुळे क्रिकेटचे वेळापत्रक अधिकच व्यस्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, हरभजनने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटच्या भविष्याबद्दल आपले विचार उघडपणे व्यक्त केले. त्याने हेही उघड केले की त्याचे आत्मचरित्र या वर्षाच्या अखेरीस प्रकाशित होणार असून, तो काही काळापासून त्यावर काम करत आहे.

२३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ बळी घेणाऱ्या हरभजनने म्हटले, जर भारत आणि ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका, किंवा भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिका असेल, तर मला ती पाहायला आवडेल. कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी मी पैसे द्यायलाही तयार आहे. मला एकदिवसीय सामन्यांमध्ये रस नाही. मी ते पाहिले आहे आणि खेळलोही आहे. हरभजन म्हणाला की, कसोटी क्रिकेट क्रिकेटपटूचे कौशल्य आणि आवड यांची परीक्षा घेते आणि ते खेळाचे सर्वोच्च शिखर राहिले पाहिजे. तो म्हणाला, कसोटी क्रिकेट हेच अंतिम क्रिकेट आहे. खेळातील सर्व संबंधितांनी कसोटी क्रिकेटचे जतन आणि प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम क्रिकेट आहे. ते एक क्रिकेटपटू म्हणून तुमची सर्व प्रकारे परीक्षा घेते.

भारतातील प्रचंड लोकप्रिय आयपीएलपासून ते ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (बीबीएल) आणि इंग्लंडच्या 'द हंड्रेड'पर्यंत, फ्रँचायझी क्रिकेटने प्रेक्षकांकडून व्यापक पाठिंबा मिळवत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. टी-२० क्रिकेटच्या वाढत्या वर्चस्वामुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हरभजन म्हणाला की, फ्रँचायझी-आधारित लीग सामन्यांमधील खचाखच भरलेली स्टेडियम्स हे क्रिकेटप्रेमींच्या आवडीनिवडीतील हा बदल समजून घेण्यासाठी पुरेसा पुरावा आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande