
लातूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन यंदा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी देशभर उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले असून, राज्यातील जिल्हानिहाय ध्वजारोहणाची जबाबदारी पालकमंत्री व मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, लातूर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आमदार शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याकडे लातूरकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईतील मंत्रालयासमोरील मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वाजता होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्येही ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर येथे राधाकृष्ण विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगर येथे संजय शिरसाट, सातारा येथे शंभुराज देसाई आणि कोल्हापूर येथे प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
एखाद्या कारणामुळे संबंधित पालकमंत्री किंवा मंत्री ध्वजारोहणासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, तर विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची तरतूद परिपत्रकात करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लातूरसह राज्यभरात शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि विविध ठिकाणी तयारीला वेग आला असून, १५ ऑगस्टच्या सोहळ्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis