भारताच्या निर्यातीत जुलैमध्ये 19.63 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.) : भारताच्या वस्तू निर्यातीत जुलै 2026 मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, निर्यात 19.63 टक्क्यांनी वाढून 44.24 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही निर्यात 36.98 अब्ज डॉलर होती. दरम्यान, आयात 17.52 टक्क्
निर्यातीचा प्रतिकात्मक लोगो


नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.) : भारताच्या वस्तू निर्यातीत जुलै 2026 मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, निर्यात 19.63 टक्क्यांनी वाढून 44.24 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही निर्यात 36.98 अब्ज डॉलर होती. दरम्यान, आयात 17.52 टक्क्यांनी वाढून 76.22 अब्ज डॉलरवर गेल्याने जुलै महिन्यातील व्यापार तूट 31.98 अब्ज डॉलरवर पोहोचली.

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यापारविषयक आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, जुलैमध्ये पश्चिम आशियातील देशांना भारताची निर्यात 8.62 टक्क्यांनी वाढून 5.7 अब्ज डॉलर झाली. पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी उत्पादने आणि सागरी उत्पादनांच्या वाढलेल्या निर्यातीमुळे एकूण निर्यातीत वाढ झाली आहे.

भारताच्या निर्यात वाढीत वस्तू निर्यातीचा मोठा वाटा राहिला. जुलैमध्ये 44.24 अब्ज डॉलरची वस्तू निर्यात ही आतापर्यंतच्या जुलै महिन्यातील सर्वोच्च पातळी ठरली आहे. या निर्यातीने 2022 मध्ये नोंदवलेला 38.34 अब्ज डॉलरचा यापूर्वीचा विक्रमही मागे टाकला.

मात्र, याच काळात वस्तू आयातही 17.52 टक्क्यांनी वाढून 76.22 अब्ज डॉलर झाली. जुलै 2025 मध्ये ती 64.86 अब्ज डॉलर होती. जुलै 2026 मध्ये सेवा निर्यात 35.89 अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज आहे, तर जुलै 2025 मध्ये ती 33.74 अब्ज डॉलर होती. सेवा आयातही 17.30 अब्ज डॉलरवरून वाढून 18.94 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे.

एप्रिल-जुलैमध्ये एकूण निर्यात 316.42 अब्ज डॉलर

चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत भारताची एकूण निर्यात 13.16 टक्क्यांनी वाढून 316.42 अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 279.63 अब्ज डॉलर होती. या काळात एकूण आयात 17.28 टक्क्यांनी वाढून 365.85 अब्ज डॉलर झाली; मागील वर्षी ती 311.94 अब्ज डॉलर होती.

यामुळे एप्रिल-जुलै कालावधीतील संचयी व्यापार तूट 32.32 अब्ज डॉलरवरून वाढून 49.43 अब्ज डॉलर झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, व्यापार तुटीत 52.97 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या चार महिन्यांत वस्तू निर्यात 17.04 टक्क्यांनी वाढून 173.78 अब्ज डॉलर झाली, तर वस्तू आयात 19.27 टक्क्यांनी वाढून 292.38 अब्ज डॉलरवर पोहोचली.

चीन आणि अमेरिकेला निर्यातीत वाढ

भारताच्या प्रमुख निर्यात बाजारपेठांमध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल-जुलैदरम्यान चीनला भारताची निर्यात 5.72 अब्ज डॉलरवरून वाढून 7.78 अब्ज डॉलर झाली. त्याचप्रमाणे, अमेरिकेला होणारी निर्यात 33.48 अब्ज डॉलरवरून वाढून 34.49 अब्ज डॉलर झाली आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande