
लातूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। लातूर, दि.पोलीस प्रशासनाच्या वतीने 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जेएसपीएम संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा अनेकांना नोकरी देणारे उद्योजक बना, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर होते. तसेच जेएसपीएम संस्थेच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, समन्वयक अनिरुद्ध पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत गौड, प्राचार्य डॉ. निलेश पौळ, उपप्राचार्य दयानंद हासबे, प्राचार्य डॉ. के. एम. बकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याला दिशा देणारे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबरोबरच संस्कारात्मक शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थी जीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता त्यांचा सामना केला पाहिजे. शिक्षणाचा पाया भक्कम असणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, शिक्षण घेण्यामागील उद्देशाचा आणि भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार केला पाहिजे. समाजाप्रती आपली भूमिका काय आहे, संस्थेबद्दल आपली अस्मिता काय आहे, याचाही विचार विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहून चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्वाची चांगली जडणघडण होईल, असे त्यांनी सांगितले.
मोबाईल हे आजच्या जीवनातील महत्त्वाचे साधन झाले आहे. त्याचा अतिरेक झाल्यास माणूस माणसापासून दूर जाऊ शकतो; मात्र त्याचा सकारात्मक वापर केल्यास जगभरातील ज्ञान सहज उपलब्ध होते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे. कोणत्याही ठिकाणी काम करताना ते आपलेच काम समजून प्रामाणिकपणे केल्यास जीवनातील अडचणींवर मात करता येईल. अशा संस्कारातून चांगले नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत गौड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.बी.एम.शिंदे यांनी केले तर आभार उपप्राचार्य दयानंद हासबे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनेल - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
जेएसपीएम संस्थेची 1983 मध्ये स्थापना झाली असून, संस्थेअंतर्गत असलेल्या विविध युनिटच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यावसायिकतेवर आधारित तेजस्वी तरुण घडविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. शिक्षणाबरोबरच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या भूमिकेतून संस्थेची वाटचाल सुरू आहे,
जेएसपीएम संस्थेच्या कार्याची दखल घेत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नवभारत सीएसआर पुरस्काराने संस्थेचा गौरव करण्यात आला आहे. तसेच पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंत वेणू पुरस्कारानेही आम्हाला सन्मानित करण्यात आले आहे. जेएसपीएम संचालित श्री स्वामी विवेकानंद विद्यालयास 11 लाख रुपये, तर बिटरगाव येथील शिवाजी विद्यालयास 1 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत निजाम, हुमायून यांच्याविषयी माहिती देण्यात आली; मात्र छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि प्रभू श्रीराम यांच्या विषयी पुरेशी माहिती देण्याचे काम केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणपद्धतीत बदल करण्यात येत असून अध्यात्म, विज्ञान, योग आणि भारतीय संस्कृतीला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे या देशाच्या चौफेर प्रगतीतून 2047 पर्यंत भारत महासत्ता बनून विश्वगुरू बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमध्ये जागतिक अभ्यासाचे कौशल्य निर्माण करू : अजित पाटील कव्हेकर
जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून अपडेट आणि अपग्रेड विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रत्येक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून, बदलत्या परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एआय कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. आगामी दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. जगातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात अद्ययावत करण्यासाठी जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करून एआय केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागतिक अभ्यास करण्याचे कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis