खरिप हंगामात आंतरमशागतीला वेग; मजुरीचे दर वाढले
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.) : खरीप हंगामातील पिकांची आंतरमशागत सध्या वेगाने सुरू झाली असून, अमरावती तालुक्यात मजूर तसेच बैलजोडीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना वेळेत मशागत करून घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, आंतरमशागतीच्
आंतरमशागतीला वेग; मजुरीचे दर वाढले


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.) :

खरीप हंगामातील पिकांची आंतरमशागत सध्या वेगाने सुरू झाली असून, अमरावती तालुक्यात मजूर तसेच बैलजोडीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना वेळेत मशागत करून घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, आंतरमशागतीच्या मजुरीच्या दरात यंदा सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने उत्पादन खर्चाचे गणित बिघडले आहे. पिकांमध्ये वाढलेले गवत काढणे, खुरपणी, निंदणी, डवरणी, फवारणी यासह अन्य आंतरमशागतीची कामे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंतरमशागतीच्या कामांच्या दरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बैलजोडीसह मालकाकडून एक एकर कपाशी पिकात डवरणी करून घेण्यासाठी सुमारे सोळाशे ते दोन हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. वेळेत डवरणी व अन्य आंतरमशागतीची कामे न झाल्यास पिकांमध्ये तण वाढून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशके तसेच मजुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडत आहे. शासनाने उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतमालाला योग्य भाव व शेतकऱ्यांना आवश्यक सवलती देणे गरजेचे आहे. -राहुल उके, माजी सरपंच, सावर्डी.

मजुरांच्या शोधासाठी शेतकऱ्यांची धावपळ अमरावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला मजुरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अधिकचे पैसे देण्याची तयारी असूनही महिला मजूर उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या शोधासाठी घरोघरी फिरावे लागत आहे. काही महिला मजुरांनी मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेतल्याचेही सांगितले जात आहे.

रासायनिक निविष्ठांच्या दरवाढीचीही भर

एकीकडे मजुरीचे दर वाढले असताना दुसरीकडे रासायनिक खते आणि फवारणीची औषधेही महाग झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फवारणी न केल्यास पिकांची वाढ मंदावण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यामुळे फवारणी करण्याशिवाय पर्याय नसल्याची परिस्थिती आहे. मजूर उपलब्ध होत नसल्याने काही शेतकरी गवत नियंत्रणासाठी तणनाशक औषधांचा वापर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande