
लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
शेतीला जोडधंदा म्हणून जपलेला दुग्ध व्यवसाय आता चाऱ्याच्या टंचाईमुळे अडचणीत सापडला आहे.
देवणी तालुक्यात कडबा आणि हिरवा चारा दिवसेंदिवस दुर्मीळ होत असून, शेतातून चारा मिळणे कठीण झाले आहे. बाजारपेठेतही चाऱ्याची आवक घटल्याने उपलब्ध चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे गायी-म्हशींचे पालन करणाऱ्या पशुपालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून, जनावरांना काय खाऊ घालायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे बदलते स्वरूप, पावसाची अनिश्चितता, पिकांमध्ये झालेला बदल आणि चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकांचे घटलेले क्षेत्र यामुळे कडब्याची उपलब्धता कमी झाल्याचे पशुपालक सांगत आहेत.
पूर्वी शेतातील ज्वारी, बाजरी तसेच
इतर पिकांमधून मोठ्या प्रमाणात
कडबा उपलब्ध होत असे. मात्र
आता बोटावर मोजण्याइतकेच
शेतकरी ज्वारी-बाजरीची पिके घेत आहेत. त्यामुळे कडब्याचे उत्पादनही घटले आहे.
उत्पादित होणारा कडबा विक्रीसाठी ठेवण्याऐवजी शेतकरी तो स्वतःच्या जनावरांसाठी साठवून ठेवत आहेत. परिणामी बाजारपेठेत येणाऱ्या कडब्याची आवक कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम दरावर होत आहे. चारा मिळत नाही आणि मिळाला तर परवडत नाही, अशी अवस्था पशुपालकांची झाली आहे. हिरवा चारा मिळणेही कठीण झाले आहे
कडब्यासोबतच हिरव्या चाऱ्याचीही कमतरता जाणवत आहे. जनावरांना नियमित हिरवा चारा मिळत नसल्याने पशुपालकांना बाहेरून चारा आणावा लागत आहे. त्यातच उपलब्ध हिरव्या चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने दुधाळ जनावरांचे संगोपन करणे अधिकच खर्चिक ठरत आहे. दूध उत्पादनासाठी जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो. मात्र चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास जनावरांच्या
आरोग्यावर तसेच दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चारा टंचाईचा थेट फटका दुग्ध व्यवसायाला बसण्याची भीती पशुपालक व्यक्त करीत आहेत.
बाजारातील आवक घटली; खर्चाचा भार वाढला...
देवणी तालुक्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये कडबा आणि हिरव्या चाऱ्याची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चाऱ्याचे दर वाढत आहेत. पशुपालन हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करून घरखर्च भागविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चारा महाग होणे म्हणजे उत्पादन खर्चात थेट वाढ होय.
एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचा, पशुखाद्याचा आणि संगोपनाचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे दुधाला मिळणारा दर त्या तुलनेत पुरेसा नसल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जनावरांच्या पोटाची चिंता आणि वाढत्या खर्चाचे गणित यामध्ये पशुपालक अक्षरशः कोंडीत सापडला आहे.
प्रशासना कडून उपाययोजना अपेक्षित..
तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चाऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. गावनिहाय चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन गरज असलेल्या भागात चारा उपलब्ध करून देणे, चारा छावणी अथवा शासकीय यंत्रणेमार्फत आवश्यक उपाययोजना करणे आणि पशुपालकांना मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis