कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला अखेर गती; मार्चअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील बहुचर्चित आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. हा प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. मात्र, रस्त
Ring Road Pune


पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील बहुचर्चित आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. हा प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. मात्र, रस्त्याच्या कामात अद्याप अडथळा ठरणारे विद्युत पोल आणि भूसंपादनाच्या अवॉर्डमधून राहिलेल्या सुमारे दहा मालमत्तांमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पावसाळी गटार, ड्रेनेज लाईन तसेच सेवा रस्त्यांची कामे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी अद्याप विद्युत पोल उभे असल्याचे तसेच भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

रस्त्याच्या कामात कोणत्याही विभागातील समन्वयाचा अभाव किंवा प्रशासकीय निर्णयांमुळे विलंब होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.कामाच्या प्रगतीत अडथळे येत असल्यास आवश्यक त्या ठिकाणी समक्ष आदेश घेऊन काम पुढे नेण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंता धनंजय गायकवाड यांना दिले. विद्युत पोलचे स्थलांतर तसेच भूसंपादनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. वाढती वाहतूक आणि परिसरातील नागरीकरणामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.आता मार्चअखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याने उर्वरित कामांना वेग देण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. विशेषतः विद्युत पोल आणि भूसंपादनाचा प्रश्न वेळेत सोडविणे प्रकल्पाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande