कृषी व्यवसायांना आर्थिक सहाय्य पात्र संस्थांना डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज  करण्याचे आवाहन
जळगाव, 13 ऑगस्ट, (हिं.स.) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (NDKSP) मूल्यसाखळी आधारित विविध कृषी व्यवसायांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ३१९ गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हवामान अनु
कृषी व्यवसायांना आर्थिक सहाय्य पात्र संस्थांना डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज  करण्याचे आवाहन


जळगाव, 13 ऑगस्ट, (हिं.स.) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (NDKSP) मूल्यसाखळी आधारित विविध कृषी व्यवसायांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ३१९ गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेतीसाठी सक्षम करणे, कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे आणि शेती अधिक किफायतशीर करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

प्रकल्पांतर्गत ‘उत्पन्न वाढीचे स्रोत बळकटीकरण’ या घटकातून शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, महिला स्वयंसहाय्यता गट, ग्राम संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र तसेच पेसा ग्रामसभा/ग्रामपंचायतींना विविध कृषी व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये गोदाम, छोटे वेअरहाऊस, शीतगृह, फार्मगेट पॅकहाऊस, शीतखोली, निंबोळी अर्क युनिट, गौण वनउपज प्रक्रिया केंद्र, शेतावर जैविक खत निर्मिती, पशुखाद्य युनिट, जैव-सेंद्रिय निविष्ठा निर्मिती केंद्र, नाडेप युनिट, मुरघास युनिट, दाल मिल, धान्य, बियाणे, हळद, आले, बटाटा, मका, कापूस, दूध, अन्न, मसाले, सुगंधी व औषधी वनस्पती, फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिट, सोयामिल्क प्रक्रिया युनिट, तेलगाळप युनिट, डिहायड्रेशन युनिट आणि फळ पिकवणी युनिट आदींचा समावेश आहे. पात्र प्रकल्पांना प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत, कमाल ६० लाख रुपयांपर्यंत बँक एंडेड अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी गावस्तरावर महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन करण्याची तरतूद आहे. यासाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के किंवा कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. पात्र महिला बचत गटांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्प गावातील महिला स्वयंसहाय्यता गट, ग्राम संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र तसेच पेसा ग्रामसभा/ग्रामपंचायती यांनी https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ या डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फेत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande