
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।bमाढा शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या श्री माढेश्वरी मंदिर परिसरात एक कोटी रुपये खर्च करून ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत माढा नगरपंचायत क्षेत्रात उत्कृष्ट आणि सर्वसोयींयुक्त उद्यान विकसित करण्यासाठी शासनाकडूनएक कोटी रुपयांचा निधीमंजूर करण्यात आला आहे. या निधीतून श्री माढेश्वरी मंदिर परिसराचा विकास करून नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.‘नमो उद्याना’चे काम लवकरात लवकर आणि उच्च गुणवत्तेने पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेत खुले करण्यात येईल, असा विश्वास माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे आणि मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी व्यक्त केला.
उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी, जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षाची व्यवस्था केली जाणार असून, योग आणि ध्यानधारणेसाठीही स्वतंत्र जागा उपलब्ध असेल.दिव्यांग नागरिकांनाही उद्यानाचा सहज वापर करता यावा यासाठीरॅम्प आणि रेलिंगची विशेष व्यवस्थाकरण्यात येणार आहे.उद्यान परिसरात स्थानिक आणि देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच औषधी वनस्पती आणि विविध प्रकारच्या फुलबागेमुळे परिसरात हिरवाई वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे श्री माढेश्वरी मंदिर परिसराला धार्मिक महत्त्वासोबतच आकर्षक पर्यटन व विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड