यवतमाळ : जुन्या पोलिस कोर्ट परिसरात वैद्यकीय कचरा उघड्यावर
यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील जुन्या पोलिस कोर्ट परिसरात काही खासगी दवाखान्यांमधून निघणारा धोकादायक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वापरलेले मास्क, सिरिंज तसेच उपचारानंतर रक्त लागलेले कापसाचे बोळे परिसरात
जुन्या पोलिस कोर्टाजवळ उघड्यावर वैद्यकीय कचरा:परिसरामध्ये दुर्गंधी


यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील जुन्या पोलिस कोर्ट परिसरात काही खासगी दवाखान्यांमधून निघणारा धोकादायक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वापरलेले मास्क, सिरिंज तसेच उपचारानंतर रक्त लागलेले कापसाचे बोळे परिसरात फेकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रुग्णांवर उपचार करताना वापरलेले कापूस, रक्ताने माखलेले साहित्य, मास्क, सिरिंज आदी वैद्यकीय कचऱ्याची नियमबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र, हा कचरा थेट सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह लहान मुले आणि भटक्या प्राण्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेषतः वापरलेल्या सिरिंज तसेच रक्त लागलेल्या वैद्यकीय साहित्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून, संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रकार सुरू असताना नगरपरिषद प्रशासन आणखी किती दिवस डोळेझाक करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित दवाखान्यांची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तातडीने पाहणी करून कारवाईची मागणी

जुन्या पोलिस कोर्ट परिसरात उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या दवाखान्यांची तातडीने पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच परिसराची स्वच्छता करून भविष्यात अशा प्रकारे वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जाणार नाही, यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागाने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande