आयमा-महावितरणच्या दरमहा बैठकीने उद्योजकांच्या समस्या सुटण्यास प्रारंभ
नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि महावितरण यांच्या पुढाकाराने उद्योजकांच्या वीजविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दरमहा आढावा बैठकीमुळे औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लाग
Monthly meetings of AIMA


नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि महावितरण यांच्या पुढाकाराने उद्योजकांच्या वीजविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दरमहा आढावा बैठकीमुळे औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे.

आयमा रिक्रिएशन सेंटर येथे झालेल्या बैठकीत अंबडसह सातपूर, विल्होळी, सिन्नर, इगतपुरी, मुसळगाव, पाथर्डी आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या मांडल्या.आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मासिक बैठकीत मागील महिन्यातील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.उद्योजक प्रशांत बडगुजर यांनी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी उद्योजकांना पूर्वसूचना देण्यात यावी तसेच शटडाऊनचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली तर अशोक आरोटे यांनी केबल वर्कचे काम सुरळीत झाल्याची माहिती दिली.मधुकर ब्राह्मणकर यांनी सोलर संच बसविणाऱ्या उद्योजकांना फ्री युनिट्स, ग्रीड सपोर्ट चार्जेस, केव्हीएच, पॉवर फॅक्टर, वाढीव चार्जेस तसेच लोडसंदर्भात अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. सोलर बसवूनही अपेक्षित लाभ मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पी. पी. माहेश्वरी यांनी दर्जेदार वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होत असून महावितरणकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली. नितीन आव्हाड यांनी सातपूर येथील औद्योगिक सोसायट्यांमधील वीज यंत्रणेच्या समस्यांकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी उद्योजकांनी स्वतःच्या खर्चातून यंत्रणा दुरुस्त केल्याचे त्यांनी सांगितले.संतोष नावंदर यांनी वारंवार होणाऱ्या शटडाऊनमुळे उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून कामगारांना कामाविना बसून राहावे लागत असल्याचे सांगितले. विल्होळी परिसरातील समस्या राहुल गांगुर्डे आणि जितेंद्र सोनवणे यांनी मांडल्या. ज्या कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे, तो संबंधित कंपनीच्या आवारात हलविण्याची मागणी करण्यात आली.रणजित सानप यांनी सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील वीजविषयक समस्यांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील उद्योगांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. अशलेष आहेर यांनी के सेक्टरमधील रस्त्यांची उंची वाढल्यामुळे जुन्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे नमूद केले.मनीष रावळ यांनी महिंद्रा कंपनीसह अनेक उद्योगांना ओव्हरलोडचा त्रास होत असल्याचे सांगितले. साई प्रकाश पेपरचे सम्राट बजाज यांनी पॉवर फॅक्टरमध्ये बदल झाल्यामुळे टीओडी टॅरिफचा प्रश्न निर्माण होत असून वीजबिले मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची तक्रार केली.

उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता चेतन वाडे यांनी पुढील मासिक बैठकीपूर्वी बहुतांश प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. मागील महिन्यात छत्रपती शिवाजी, सपट आणि घरकुल फिडर संदर्भात करण्यात आलेली कामे प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आली.फॉल्ट शोधण्यासाठी वाहनांचे नियोजन करण्यात येणार असून, पुढील बैठकीस संबंधित ठेकेदारांनाही उपस्थित केले जाणार आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांऐवजी नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची कार्यवाही केली जाईल. एच सेक्टरमधील वायरिंग व डीओचे काम, पालापाचोळा हटविणे तसेच मिनी फिडरला नवीन दरवाजे बसविण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती वाडे यांनी दिली.गरवारे ते एक्सलो पॉईंट या मार्गावरील केबल भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत उद्योजकांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना देण्यात येईल. सोलर पॉलिसीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न दोन ते चार दिवसांत सोडविण्यात येईल, तर सातपूर येथील औद्योगिक सोसायटीतील समस्येवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असून कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती वाडे यांनी दिली.डब्ल्यू-२३, १९४ आणि सुमित कंपाउंड परिसरातील समस्या सोडविण्यात येतील. केबलमुळे ज्या उद्योजकांचे नुकसान होत आहे, त्याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. नवीन सबस्टेशन सुरू झाल्यानंतर महिंद्रा कंपनीचा ओव्हरलोडचा प्रश्नही सुटेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.उद्योजकांनी वीजविषयक समस्या निर्माण झाल्यास महावितरणच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले.यावेळी आयमाचे सरचिटणीस संजय महाजन, सचिव दिलीप वाघ, आयमा पॉवर कमिटीचे चेअरमन रवींद्र झोपे, महावितरणचे अधिकारी तसेच अंबड, सातपूर, विल्होळी, सिन्नर, इगतपुरी, मुसळगाव, पाथर्डी आदी भागांतील अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande