बीडमध्ये ‘नगर वन योजना’ राबवण्याच्या हालचालींना वेग
बीड, 13 ऑगस्ट, (हिं.स.) जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नगर वन योजने’अंतर्गत बीड शहरासह प्रमुख नगरपरिषद क्षेत्रांमध्ये नागरी वने उभारण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवण्याचे स्पष्ट निर्देश राज्या
बजरंग सोनवणे


बीड, 13 ऑगस्ट, (हिं.स.) जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नगर वन योजने’अंतर्गत बीड शहरासह प्रमुख नगरपरिषद क्षेत्रांमध्ये नागरी वने उभारण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याच्या वन विभागाने दिले आहेत. बीडचे खासदार डॉ. बजरंग सोनवणे यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य वनसंरक्षकांना यासंदर्भात त्वरित कार्यवाही करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या घडामोडीची पार्श्वभूमी संसदेतील एका प्रश्नाशी जोडलेली आहे. खासदार डॉ. बजरंग सोनवणे यांनी लोकसभा अधिवेशनात बीड जिल्ह्यातील गंभीर पर्यावरणीय परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी महाराष्ट्र सरकारकडून बीडसाठी नगर वन योजनेचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली होती. या उत्तरानंतर खासदार सोनवणे यांनी २१ मे २०२६ रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे पाठवण्याची मागणी केली. या पत्राची दखल घेत वन विभागाने ५ जून २०२६ रोजी कार्यवाही सुरू केली व नागपूर कार्यालयातून नुकताच छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य वनसंरक्षकांना बीड विभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत शासकीय जागांचा तातडीने सर्व्हे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

या योजनेमुळे बीड शहरातील उपलब्ध शासकीय जमिनींवर वृक्षाच्छादन वाढवले जाईल. बीड जिल्हा वारंवार दुष्काळाचा सामना करत असून वाढते तापमान व खालावत चाललेली भूजल पातळी या पार्श्वभूमीवर नागरी वनांची निर्मिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवामान शुद्धता आणि हरित क्षेत्र वाढीस मदत होणार असून लवकरच हा प्रस्ताव केंद्राकडे वर्ग होऊन निधी मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande