
नवी दिल्ली , 13 ऑगस्ट (हिं.स.)। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना हल्ल्यामागील कारणाचा शोध घेण्याचे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी सांगितले की, नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी पोलीस महानिरीक्षकांशी (आयजी) चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तो गेल्या दोन वर्षांपासून गुरुद्वारात स्वयंसेवक म्हणून काम करत होता. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची आस्थेने माहिती घेतली आणि ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.तसेच, या हल्ल्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी हरसिमरत कौर यांना दिले. हल्लेखोरांविरोधात लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलीस प्रशासनाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे, सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहिली आहे का याची तपासणी करण्याचे तसेच या कृत्यामागे सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसपाल सिंह याने गुरुद्वारा माता साहिब कौर जी येथे सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला केला. बादल यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हेही जखमी झाले. या घटनेत बादल आणि पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.दोन्ही जखमींना यशो साई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
घटनेनंतर नांदेड पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेले सुखबीर सिंह बादल आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या प्रकृतीबाबतच्या सविस्तर वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode