
हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन; गुणवंत विद्यार्थी व सिद्धी क्षीरसागर यांचा होणार गौरव
रायगड, १३ ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यदिनानिमित्त नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण जागवून नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नेरळ येथील हुतात्मा चौकातून १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मशाल फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजता हुतात्मा चौकात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा देत तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमात नेरळ परिसरातील दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या कु. सिद्धी सदानंद क्षीरसागर यांचा विशेष गौरव करण्यात येणार असून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच नेरळमधून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. सायली शशिकांत मुंढे यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच देशप्रेमी नागरिकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
हुतात्मा स्मारक समिती, नेरळ यांच्या वतीने नागरिकांनी या देशभक्तिपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)