
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे महापालिकेचा कारभार गतिमान असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधारीांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती, ठेकेदारांमधील वाद आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे विकासकामांचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असताना पथ विभागाने काढलेल्या १०२ निविदांपैकी केवळ आठ निविदांनाच गती मिळाल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील विकासकामे तसेच रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. यासाठी प्रथम कामाचे पूर्वगणनपत्रक तयार केले जाते. त्यानंतर प्रशासकीय समिती आणि वित्तीय समितीची मान्यता घेतल्यानंतर निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होते.निविदा मागविल्यानंतर साधारण दोन ते तीन आठवड्यांनी ठेकेदारांनी सादर केलेले कागदपत्रांचे ‘अ’ पाकीट उघडले जाते. यामध्ये निविदेतील अटी व शर्तींनुसार संबंधित ठेकेदाराचा अनुभव, आर्थिक क्षमता, प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता तसेच त्याने केलेल्या अन्य कामांची माहिती तपासली जाते.या छाननीमध्ये पात्र ठरणाऱ्या ठेकेदारांचे आर्थिक प्रस्ताव असलेले‘ब’ पाकीट उघडले जाते.यामध्ये कामासाठी सर्वांत कमी दर देणाऱ्या पात्र ठेकेदाराची निवड करून त्याला काम देण्याची प्रक्रिया केली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु