
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)
ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण (ता. माढा) येथे श्रीफळ हंडी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. संत सावता महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या घराण्याला श्रीफळ हंडी फोडण्याचा पारंपरिक मान आहे. या परंपरेनुसार बाळासाहेब देहूकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्रीफळ हंडी फोडली. यावेळी काल्याचेकीर्तनहीपार पडले.पंढरपूरहून आलेली विठुरायाची पालखी तसेच संत सावता महाराज यांच्या पालखीसमोर श्रीफळ हंडीचा सोहळा पार पडला. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.दहीकाल्याच्या हंडीभोवती भाविकांनी श्रद्धेने प्रदक्षिणा घातली. अनेक भाविकांनीनवसाचेनारळही हंडीला बांधले. हरिभाऊ गिड्डे आणि नागनाथ गिड्डे या मानकऱ्यांच्या घरून पारंपरिक पद्धतीने समारंभपूर्वक श्रीफळ हंडी आणण्यात आली. त्यानंतर ती पारावर बांधण्यात आली.संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अरणमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीफळ हंडी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड