
सिंधुदुर्ग, 13 ऑगस्ट (हिं.स.) । शासनातर्फे दिले जाणारे सिंधुदुर्ग जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण येत्या १५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीच्या बैठकीत युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गांतल्या पुरस्कारार्थींची छाननी, गुणांकन आणि चर्चेनंतर सर्वानुमते निवड करण्यात आली.
युवक पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातले निरवडे गावचे जयराम आत्माराम जाधव यांना तर युवती पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातीलच कोलगावच्या फिजा अब्दुल मकानदार यांना जाहीर झाला आहे. संस्था प्रवर्गातुन कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टला ओरोस येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. युवक आणि युवती प्रवर्गातल्या पुरस्कारार्थींना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये १० हजार, तर संस्था प्रवर्गातल्या पुरस्कारार्थी संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये ५० हजार देऊन गौरविण्यात येणार आहे.
संस्था पुरस्कार जाहीर झालेली कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेल्या १५ वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित आणि ग्रामीण घटकांसाठी कार्यरत आहे. शिक्षणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत, युवक विकासापासून ग्रामविकासापर्यंत तसेच पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांद्वारे विद्यार्थी, महिला, युवक आणि ग्रामीण समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा सन्मान नसून, समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, स्वयंसेवकाचा, दात्याचा आणि संस्थेसोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष योगेश भोसले आणि त्यांचे सहकारी प्रथमेश सावंत यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाचा क्षण असला, तरी त्याहून मोठी जबाबदारी घेऊन अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी